२००९ च्या प्रचारसभेतील व्हिडिओप्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना समन्स
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण : २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारसभेत दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओप्रकरणी कल्याण न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समन्स बजावले आहे. उद्धव ठाकरे यांनी ५ ऑगस्ट, तर एकनाथ शिंदे यांनी ६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांच्याबाबतचा एक व्हिडिओ प्रचारसभेत दाखवून बदनामी केल्याचा आरोप करत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, तत्कालीन उमेदवार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. संबंधित व्हिडिओ एडिट करून दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्याचा दावा डावखरे यांनी केला होता.
दरम्यान, हा निवडणुकीतील राजकीय वादाचा भाग असून अशा प्रकारच्या प्रकरणांना अनावश्यक महत्त्व देण्याची गरज नसल्याचे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते ॲड. हर्षल प्रधान यांनी व्यक्त केले. न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवत पुढील सुनावणीला दोन्ही नेते हजर राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

