नवी मुंबईत हिंदी राजभाषा संमेलन; अमित शाहांची प्रमुख उपस्थिती
मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला उधाण येण्याची शक्यता
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई : राज्यात मराठी-अमराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच नवी मुंबईतील वाशी येथे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन होणार असल्याची माहिती आहे.
वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या या संमेलनाला देशभरातील हिंदी भाषिक साहित्यिक, संस्था, अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि अधिकारीही सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी मोठी पार्किंग व्यवस्था तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने मनसेकडून या निर्णयाला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वेशीवर होणाऱ्या हिंदी राजभाषा संमेलनामुळे मराठीच्या सक्तीच्या मुद्द्याला हिंदी भाषेच्या कार्यक्रमाची जोड मिळून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

