विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द; नगरविकास विभागाची अधिसूचना
सोमवारी मुंबई महापालिका सभागृहात औपचारिक घोषणा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केली असून, सोमवारी मुंबई महापालिकेच्या महासभेत याची औपचारिक घोषणा होणार आहे.
पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर नगरसेवकपदाच्या अपात्रतेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सरकारच्या अधिसूचनेनुसार, २० ऑगस्ट २०२६ पासून सहा वर्षांसाठी राऊत यांना नगरसेवक म्हणून निवडून येण्यास किंवा पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रभागाची जागा रिक्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राऊत या दादरमधील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आल्या होत्या. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने यापूर्वी मुंबई महापालिकेतील चार नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. राऊत यांच्यावरील कारवाईनंतर ही संख्या पाचवर पोहोचणार आहे.

