ठाकरे ब्रँड कायम राहिला पाहिजे, अशी आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांची इच्छा – गजानन कीर्तिकर
भाजपप्रणित असल्यामुळे शिंदे सेनेला पुढे सरकायला अडचणी, उद्धव-राज ठाकरेच नव्हे तर शिंदेंनीही एकत्र यावं
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – उद्धव आणि राज यांनी एकत्र आले पाहिजे ही महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांची इच्छा आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे ब्रँड कायम राहिला पाहिजे, अशी आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येऊन अखंड शिवसेना एक झाली पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ शिवसैनिक गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले. ‘हे दोघे एकत्र येतील की नाही हे माहिती नाही, त्यांनी अटी ठेवल्या आहेत, असे मी ऐकले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरेंनी महायुतीची सोबत सोडावी, तर राज ठाकरे उद्धव यांना काँग्रेसची सोबत सोडण्याची अट घालत आहेत. या दोन्ही अटी योग्य आहेत. दोन शिवसेनांमध्ये शिंदेंची शिवसेना भाजपप्रणित तर, उद्धव ठाकरेंची काल परवापर्यंत काँग्रेसप्रणित होती. बाळासाहेबांचे हिंदुत्व, आक्रमक शैली, राष्ट्रीयत्व, मराठी माणसांचा सर्वांगीण विकास हे मुद्दे घेऊन एकनाथ शिंदे पाऊले टाकीत होते. परंतु, भाजपप्रणित असल्यामुळे पुढे सरकायला त्यांना अडचणी येतात,’ असे कीर्तिकर म्हणाले.
शिवसेनेचा मतदार हा बाळासाहेबांच्या विचारधारेने प्रेरित आहे. त्याला भाजपप्रणित किंवा काँग्रेसप्रणित शिवसेना पचत नाही, शिवसेनेचे ते खरे स्वरूप पुन्हा प्राप्त करायचे असेल तर या दोघांनी भाजप-काँग्रेसची साथ सोडायला हवी,’ अशी अपेक्षा गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली.बाळासाहेबांची कडवट आणि भव्यदिव्य शिवसेना महाराष्ट्रात पुन्हा उभी करायची असेल तर एकनाथ शिंदे यांनीसुद्धा एकत्र यायला हवे. शिवसेना विभाजित असणे भाजपच्या पथ्यावर पडते. परंतु, अखंड शिवसेना ही काळाजी गरज आहे,’ असेही ते म्हणाले. अखंड शिवसेनेसाठी मी पुढाकार घेईन, मला तो अधिकारही आहे, कारण मी शिवसेनेच्या जडणघडणीपासून बाळासाहेबांसोबत काम करतोय. राज, उद्धव आणि एकनाथ शिंदेंना त्याची कल्पना आहे. त्यामुळे मी माझी इच्छा त्यांच्यासमोर प्रकट करेन, आग्रह धरेन, पुन्हा आमचे जुने दिवस येतील,’ असा विश्वासही कीर्तिकर यांनी व्यक्त केला.