थोड़े दिवस थांबा, महाराष्ट्राच्या मनासारखंच होणार – उद्धव ठाकरे
ठाकरे बंधु मनोमिलन-उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य; जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, संकेत नाही आता बातमीच देणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या युतीवर दोन्ही नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आला नाही, युतीची चर्चा ही कॅमेरासमोर होत नाही असं मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच या आधी २०१४ आणि २०१७ साली अशीच चर्चा झाली होती, त्यामुळे आता ताकही फुंकून प्यावं लागत असल्याचं मनसेनेच्या नेत्यांनी म्हटलं होतं.
मनसेच्या या प्रतिक्रियावर उद्धव ठाकेरेंनी वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-मनसे युतीकडे पडलेलं पुढचं पाऊल असल्याची चर्चा आहे.