नाशिकचे राजकारण बदलणार, सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते. भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता, मात्र हा विरोध झुगारून बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्यासोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला. मी भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो. मी समाजासाठी झटतो, समाजाची सेवा करतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरु केलं. पक्षासाठी काम केलं. परंतू नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला २००७ मध्ये सुरुवात झाली. ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी बडगुजर यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर २००८ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००९ ते २०१२ काळात ते नाशिक महापालिकेचे सभागृहनेते होते. तसेच २०१२ ते २०१५ या काळात बडगुजर हे महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. २०१४आणि २०१९च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनेक गुन्हेगारी घटनांमध्येही बडगुजर यांच्यावर आरोप आहे. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.