भारताची पहिली टेस्ला कार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या ताब्यात; नातवाच्या स्वप्नाला मिळाली उंच भरारी
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या परिवारासाठी भारतातील पहिली टेस्ला कार खरेदी केली आहे. टेस्ला कंपनीच्या ‘वाय मॉडेल’ प्रकारातील ही कार देशात प्रथमच दाखल झाली असून तिची किंमत अंदाजे ६० ते ७० लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. या गाडीच्या खरेदीमुळे केवळ सरनाईक परिवारातच नव्हे तर ठाणे परिसरातही मोठी चर्चा रंगली आहे. सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी या खरेदीबाबत आनंद व्यक्त करताना सांगितले, “टेस्ला ही जगभरातील लोकप्रिय इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. तिचे ‘वाय मॉडेल’ हे गाडीप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. देशातील पहिली गाडी आमच्या घरात आल्याने आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. ही गाडी पर्यावरणपूरक आहे तसेच नव्या पिढीला वेगळी जाणीव देणारी आहे. त्यामुळे हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आहे.”
विशेष म्हणजे, प्रताप सरनाईक यांनी ही गाडी आपल्या लहान नातवासाठी घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. पूर्वेश सरनाईक म्हणाले, “आमचा मुलगा रेयांश गाड्यांचा प्रचंड शौकीन आहे. तो अवघा तीन वर्षांचा असला तरी त्याला जगभरातील गाड्यांची नावं, मॉडेल्स आणि इंजिनची माहिती आहे. परदेशात असताना तो टेस्लाच्या कारमध्ये बसला होता आणि त्याने आजोबांकडे टेस्ला घेऊन द्या, अशी इच्छा व्यक्त केली होती. आज तीच इच्छा पूर्ण झाली आहे. आता ही कार आजोबा-नातूची खास गाडी ठरणार आहे.” यापुढे सरनाईक जिमला जाताना किंवा नातवाला शाळेत सोडताना हीच गाडी वापरणार असल्याचेही पूर्वेश यांनी हसत-हसत सांगितले.
पर्यावरणपूरक वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात दर्शवणारी टेस्ला कार महाराष्ट्रात दाखल झाल्याने, वाहनप्रेमींमध्येही याबाबत मोठा उत्साह दिसून येतो आहे.