• Sat. Oct 18th, 2025

“आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज”; अविनाश जाधवांचा शिंदे गटावर इशारा, राजन विचारे-अविनाश जाधव ठाण्यात एकत्र; मनसे-ठाकरे गटाची संयुक्त पत्रकार परिषद



“आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज”; अविनाश जाधवांचा शिंदे गटावर इशारा,
राजन विचारे-अविनाश जाधव ठाण्यात एकत्र; मनसे-ठाकरे गटाची संयुक्त पत्रकार परिषद

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे — आगामी ठाणे महापालिका निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश जाधव यांनी ठाण्यातील सत्ताधारी शिंदे गटावर थेट निशाणा साधत, “आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज आहोत, आता पैसा टिकणार नाही!” असा इशारा दिला. लवकरच ठाण्यातील वाहतूक कोंडीविरोधात मोठा मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली.

जाधव म्हणाले, “ठाण्यात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आलं आहे, पण आम्ही घाबरणार नाही. ठाणेकरांसाठी एकत्र लढू. पाणीविक्री, वाहतूक कोंडी आणि भ्रष्टाचारामुळे ठाणे महानगरपालिका लुटली गेली आहे. चार हजार कोटींची पालिका या सत्ताधाऱ्यांनी उद्ध्वस्त केली. जेव्हा आमची सत्ता येईल, तेव्हा प्रत्येकाचा हिशोब घेतला जाईल आणि दोषींना जेलमध्ये टाकू.”

यावेळी जाधवांनी जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख करत, ठाण्यातील विरोधकांच्या एकत्रित लढाईचे संकेत दिले. त्यामुळे मनसे महाविकास आघाडीसोबत येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचारावर सविस्तर भाष्य करत शिंदे गटावर आगपाखड केली. त्यांनी सांगितले, “२०१७ नंतर आजपर्यंत ठाणे महापालिकेची एकही निवडणूक घेतली नाही. पालिकेकडे निधी नाही, शासनाकडून आलेल्या पैशांचा हिशोब नाही, सर्व कामे कागदावरच सुरू आहेत. ठाणेकरांच्या पैशांची लूट सुरू आहे.”

विचारे पुढे म्हणाले, “आम्ही सोमवारी धडक मोर्चा आणत आहोत. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आम्ही प्रशासनाकडे जाब मागणार आहोत आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत.”

या पत्रकार परिषदेतून ठाण्यातील राजकीय समीकरणांना नवा कलाटणी मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास, आगामी ठाणे मनपा निवडणुकीत शिंदे गटासमोर कठीण आव्हान उभं राहणार, यात शंका नाही.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें