युटी म्हणजे युज अँड थ्रो – एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरेंनी २०१९ पेक्षा मोठा अपराध केला; वक्फ बोर्ड विधेयकाविरोधात मतदान केल्याने एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लोकसभेत बुधवारी रात्री उशिरा वक्फ बोर्ड विधेयक संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. मात्र, या विधेयकास काँग्रेससह शिवसेना उबाठा पक्षानेही विरोध केला आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केल्याने भाजपने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन भाजपचा खरा चेहरा उघडा पडल्याचे म्हटले. आता, शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९मध्ये विचारधारा सोडून अपराध केला होता. मात्र, त्यापेक्षा मोठा अपराध त्यांनी काल लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन केला, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडलेल्या भूमिकेवर शिंदेंनी हल्लाबोल केला. जी भाषा एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वापरली, तीच भाषा उद्धव ठाकरे यांची होती, असा टोलाही शिंदेंनी लगावला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले यावर बुधवारी शिक्कामोर्तब झालं आहे. वक्फ बोर्ड विधेयकाला केलेला विरोध, बाळासाहेबांचे विचार अजून हीआहेत असं म्हणणाऱ्यांची मान शरमेनं खाली गेलीय. उबाठासाठी बुधवारचा दिवस दुर्दैवी होता. वक्फ बोर्ड विधेयकास विरोध करायचा आणि हिंदुत्वाला विरोध नाही म्हणायचं , भाजपच्या ढोंगीपणाला विरोध म्हणायचं. मात्र, त्यांचीच गोंधळलेली परिस्थिती पाहायला मिळाली. पण, शिवसेनेची आणि भाजपची आजची भूमिका तीच आहे. बाळासाहेब म्हणायचे, देशभक्त मुस्लिमांना आपला पाठिंबा आहे, देशविरोधकांना नाही, हीच भूमिका आम्ही लोकसभेत दाखवल्याचं एकनाथ शिंदेनी म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांचा उल्लेख एसंशि असा केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवर केला. मला एसंशि म्हणाले मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. मला काम करु द्या, मी शांत आहे तोवर शांत आहे, जास्त बोलायला लावू नका, माझ्याकडे बोलण्यासारखे खूप आहे. मला गद्दार गद्दार बोलले, खोके खोके बोलले. पण २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला लोकांनी खोक्यात बंद केलंय. त्यांची भूमिका दुटप्पी भूमिका आहे. यांची घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे. काल जे त्यांनी केलं ते मोठा अपराध होता, असं एकनाथ शिंदे म्हणाले. राहुल गांधीची सावली मिळाल्याने उबाठाला वारंवार पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे. आता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरेंची आजची पत्रकार परिषद स्वतः ची अब्रू काढून घेणायासारखं आहे. काँग्रेसने १२३ जागांची संपत्ती डिनोटिफाय केली आणि जमिनी घशात घातल्या गेल्या. या जमिनी मूठभर लोकांकडे गेल्या. वक्फ सुधारणा विधेयकामुळे अशा मूठभर लोकांना चाप बसेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणारे, अपमान केला तरी मांडीला मांडी लावून बसत आहेत. विरोधात काँग्रेस बोलेल तेव्हा उबाठा बोलणार नाही, अबु आझमी आणि ओवेसी यांची भाषा ते बोलायला लागले आहेत. त्यामुळे, याची उत्तरं जनता घेतल्याशिवाय राहणार नाही असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.