• Sun. Oct 19th, 2025

शिवसेनेला दे धक्का ! विधानसभा निवडणुकीत १ लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’



शिवसेनेला दे धक्का ! विधानसभा निवडणुकीत १ लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाला आता महापालिका निवडणुकांच्या अगोदरच नेतेमंडळींचे धक्के बसत आहेत. कोकणानंतर आता मराठवाड्यात शिवसेना नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केलेल्या आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि मंत्री संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्या राजू शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षाची साथ सोडली आहे. अखेर, राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करत नव्या राजकीय प्रवेशाचीवाट धरली आहे. राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाकडून संजय शिरसाठ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, राजीनामा देताना चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शवत राजू शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह पदाचा आणि शिवसेना उबाठा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, मराठवाड्यात पुन्हा एकदा ठाकरेंना दे धक्का बसला आहे.

राजू शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा कळवला आहे. त्यानुसार, मी व माझे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या व शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता व आपणही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली, त्या बद्दल मी व सहकारी आपले आभारी आहोत, असे राजू शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र, मी काही कारणास्तव आणि माजी खासदार चंद्रकांत खैर यांच्याबद्दल माझी नाराजी असून मी व माझे सर्व समर्थक, सहकारी यांच्यासह शिवसेना पक्षाचा व विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही शिंदे यांनी म्हटले. दरम्यान, राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी १६,३५१ मतांनी त्यांचा पराभव केला होता. राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मतं पडली होती. तर, संजय शिरसाठ यांना १ लाख २२ हजार ४९८ मतं मिळाली होती. त्यामुळे,छ. संभाजीनगरमध्ये शिवसेना युबीटी पक्षाचा चेहरा म्हणूनही राजू शिंदेंकडे पाहिले जात. मात्र, त्यांनी आता ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अद्याप काहीही जाहीर केले नाही. मात्र, ते सत्ताधारी महायुतीमधील एका पक्षात प्रवेश करतील, असा कयास लावला जात आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें