‘एक्सक्युज मी’ बोलल्याने तरुणींना बेदम मारहाण; इंग्रजीत बोलायचे नाही मराठीत बोला म्हणत घातला वाद; तिघांवर गुन्हा नोंद
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडच्या मेळाव्यात मनसैनिकांना बँका व इतर आस्थापनामध्ये मराठी सक्तीसाठी आदेश दिले होते, त्यानंतर मनसैनिकांनी आदेशांचं पालन करत अनेक बँकांच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणल्यावर राज ठाकरे यांनी पत्रक काढून तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले होते, मात्र डोंबिवली परिसरात इंग्रजीत एक्सक्यूज मी म्हटल्याने तिघांनी तरुणींना मारहाण केल्याची घटना जुनी डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे.
डोंबिवली पश्चिमेला असलेल्या जुनी डोंबिवली परिसरात गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार तक्रारदार गीता चौहान (वय ३८) या गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहतात. याच बिल्डिंगमध्ये राहणारे अनिल पवार (वय ४०), बाबासाहेब ढबाले (वय ४१) आणि रितेश ढबाले (वय २२) यांनी त्यांना मारहाण केली आहे. सोमवारी रात्री गीता या त्यांच्या मैत्रिणीसोबत जात असताना त्यांनी रस्त्यात उभे असलेल्या तिघांना एक्सक्यूज मी बोलल्या. याचा राग येऊन त्यांनी त्यांना इंग्रजीत बोलायचे नाही मराठीत बोला असे म्हणत मारहाण केली. गीता यांची बहीण त्यावेळी तेथे आली असता तिलाही मारहाण केली. गीता यांनी याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तिघां विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. एखादया इंग्रजी वाज्यावरून महिलांना मारहाण करणे शोभणीय नसल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.