ठाकरे बंधूं एकत्र येणार! ठाकरे बंधूंचं मनोमिलनाबाबत मनसेच्या गोटातून मोठी बातमी; राज ठाकरेंचा निर्णय जवळपास निश्चित
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दारुण अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु लागली. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पण त्यानंतर पुढे फारसं काहीच घडलेलं नाही. पण आता दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता वाढली आहे. ठाकरेसेनेसोबत युती करण्यास मनसे सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंची मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या हितापुढे आमचे वाद क्षुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतरच्या पुढच्या काही तासांत उद्धव यांनी आमच्यात कधी वाद नव्हतेच. जर काही असेलच, तर ते विसरायला मी तयार आहे. सगळी भांडणं संपले, असं म्हणत उद्धव यांनी राज यांना प्रतिसाद दिला.
राज यांचे पुतणे आणि शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही महाराष्ट्र हितासाठी कोणी आमच्यासोबत संघर्ष करणार असेल तर युती करण्याची आमची तयारी असल्याचं विधान केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेच्या गोटातून महत्त्वाची बातमी आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्यास मनसे सकारात्मक आहे. याबद्दलचा निर्णय राज ठाकरेंकडून लवकरच घेतला जाईल, अशी सुत्रांची माहिती आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी वाद विसरण्यास मी तयार आहे, असं राज ठाकरेंनी आधीच म्हटलेलं आहे, अशा शब्दांत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पक्षाची भूमिका मांडली. ‘उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय राज ठाकरे घेतील. त्यांच्यासोबतचे आमचे जुने अनुभव फारशे चांगले नाहीत. ते घातक आहेत. आमचं तोंड दुधानं पोळलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही ताकसुद्धा फुंकून पिऊ,’ असं जाधव यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्यासाठी मनसे सकारात्मक असली तरी याबद्दल आस्तेकदम धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे राज यांच्या पक्षातील दुसऱ्या फळातील नेत्यांनी गेल्या महिन्याभरात युतीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.