उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस? मनसेचं नेमकं ‘राज’कारण काय ?
ठाकरे बंधुंच्या मनोमिलन होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट; वेगळ्या चर्चेला उधाण
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ठाकरे बंधु मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त १९ वर्षांनी एकत्र येतील अशी आशा अनेकांना आहे. दोन्ही बाजूंनी नेते युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडत आहे. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र दिसत असं अनेकांना वाटतंय. मात्र राजकारण इतकं सरळ कधीच नसतं. म्हणूनच ठाकरे गटासोबत युतीची चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ताज लॅण्ड्स एण्ड येथे भेट झाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र हिंदी भाषेची सक्ती नसल्याचं जीआर अद्यापही काढले गेलेले नाही, ते का काढले गेले नाही? या संदर्भात विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या भेटीचा मुंबई महापालिका निडणुकीवर काय प्रभाव पडणार हे पाहावं लागणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष आपल्या पर्यायांचा चाचपणी करत आहेत. राज ठाकरेंच्या मनेसेला देखील कुणासोबत जाणे फायदेशीर ठेरेल हे देखील पाहणे गरजेचं आहे.
महायुती सध्या राज्यात सत्तेत आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवली आहे. महायुतीसोबत युती केल्यास राज ठाकरे यांना आर्थिक आणि संघटनात्मक पाठिंबा मिळेल. मुंबईत भाजपचा आपला विशिष्ट मतदार आहे. या मतदारांचा देखील मनसेला फायदा होऊ शकतो.राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत युती केल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल, ज्यामुळे मनसेला अधिक जागा जिंकण्याची संधी मिळू शकते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचं अनेकांडून सांगितलं जात आहे. एका सर्वेक्षणानुसार, ठाकरे बंधूंची युती झाल्यास त्यांना ५२. १ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. मुंबईत ठाकरे गट आणि मनसे यांचा मराठी मतदारवर्ग मोठा आहे. युतीमुळे मराठी मतांचे विभाजन टाळता येईल. दोन्ही पक्षांना आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांची गरज आहे. युतीमुळे दोघांचाही प्रभाव वाढू शकतो. याशिवया मनसेने युती केल्यास त्यांना काँग्रेसच्या गैर-मराठी मतदारांचाही काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.