• Sun. Oct 19th, 2025

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी, ५ विदेशी विद्यापीठांना देणार इरादापत्र



नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी, ५ विदेशी विद्यापीठांना देणार इरादापत्र

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई रायजिंग – क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे त्यांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यात येईल. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. इरादापत्र आज देण्यात येणार आहेत. ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार आहे. हे शिक्षण विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाला चालना देईल आणि विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सहकार्य व संवाद वाढवेल.

भारतामध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे आणि परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस महाराष्ट्रात स्थापन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात सर्वोच्च १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे. हा प्रकल्प नवी मुंबई व मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल. महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आर्थिक लक्ष्य २०२९ पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरेल. या परदेशी विद्यापीठांमुळे मुंबई आणि नवी मुंबईचा शैक्षणिक दृष्ट्या चेहरमोहरा बदलण्यास मदत होणार आहे. शिवाय भारतात राहून परदेशी शिक्षणाचा लाभ ही या माध्यमातून घेता येणार आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें