मनसैनिकांची पहलगाम दहशतवाद्यांशी तुलना करणाऱ्या शेलारांना मनसेकडून पलटवार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना केल्यानंतर मनसेनं या टीकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी शेलक्या शब्दांमध्ये टीका केल्यानंतर मनसेनं या टीकेला उत्तर दिलं आहे. दहशतवाद्यांनी जसं पहलगाममध्ये धर्म विचारुन मारलं तसं मनसे कार्यकर्त्यांनी भाषा विचारुन मारलं असं आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. “पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारुन हिंदूंना गोळ्या मारल्या. इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतायत. दोन्ही गोष्टी उद्विग्न करणाऱ्या आहेत. व्हिडीओ काढा अथवा नका काढू पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसेचे नेते योगेश चिले यांनी भाजपाला लाज वाटली पाहिजे असं म्हटलंय. “या गोष्टीची भाजपावाल्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही भाषेसंदर्भातील हा वाद उकरुन काढला. आम्ही फक्त या महाराष्ट्राची भाषा मराठीचा आदर राखला गेला पाहिजे, इतकंच सांगत होतो. त्यावर कोणी उद्दामपणा केला असेल तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. आमची तुलना दहशतवाद्यांबरोबर केली जात असेल तर भाजपामध्ये असलेल्या मराठी लोकांनी विचार केला पाहिजे की आपण कुठल्या लोकांना साथ देत आहोत. ज्या महाराष्ट्राने या देशासाठी आपलं रक्त सांडलं. त्या महाराष्ट्रातील एका पक्षातील तरुणांना तुम्ही आज दहशतवादी ठरवायला चालला आहात. यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही.
मनसे याला उत्तर देणार का? असं विचारलं असताना योगेश चिले यांनी, “मनसे १०० टक्के, यापुढेही जो मराठीचा अपमान करणार त्याला ज्या भाषेत आतापर्यंत उत्तर दिलं त्याच भाषेत उत्तर देणार. तुम्ही आम्हाला दहशतवादी ठरवत असाल तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये बसलेलो आहोत. त्यांच्यासाठी जेव्हा उभं राहण्याची वेळ येईल, मराठीसाठी उभं राहण्याची वेळ येईल त्यावेळी तुम्ही आम्हाला दहशतवादी म्हणा किंवा आतंकवादी म्हणा आम्ही कायम उभे राहणार,” असं उत्तर दिलं. व्हिडीओ काढण्याचा आमचा उद्देश प्रसिद्धीचा नसतो. समरोच्याला कळलं पाहिजे की महाराष्ट्रात मराठीचा अपमान करणार असाल, उलटी उत्तर देणार असेल तर काय होतं हे त्या व्हिडीओतून दाखवण्याचा आमचा विचार असतो. पण ते वेगळ्या अर्थाने घेतले जात असतील तर त्या व्हिडीओंची गरज काय? असा सवाल चिले यांनी उपस्थित केला.