अखेर यशाचा गुलाल उधळला, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठे यश, आझाद मैदानात जल्लोष
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी हैद्राबाद गॅझेट नोंदींचा आधार
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार हैद्राबाद गॅझेटिअरमधील ऐतिहासिक नोंदींवर आधारित नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता निजामशाही काळात कुणबी समाजाला कापू म्हणून ओळखले जात असे. १९२१ आणि १९३१ च्या गॅझेटिअरमध्ये याबाबत स्पष्ट नोंदी आढळतात. या पुराव्यांचा आधार घेऊन मराठा समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा करण्यात येत आहे.
न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मागील दोन वर्षांत मराठवाड्यातील शासकीय कार्यालये, दिल्ली-हैद्राबाद येथील पुराभिलेख विभाग तसेच जनगणना कार्यालयातून तब्बल ७ हजारांहून अधिक कागदपत्रे गोळा केली. समितीच्या शिफारशी स्वीकारून शासनाने प्रमाणपत्र देण्यासाठी गावपातळीवरील समित्या गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही समिती ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशा तिघांचा समावेश करून चौकशी करणार आहे. अर्जदाराकडे शेतीची मालकी नसल्यास त्यांनी १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी गावात वास्तव्य असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. तसेच नातलगांकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्रही ग्राह्य धरले जाणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेत सुलभता येणार असून, आरक्षणाशी संबंधित तणावालाही दिलासा मिळणार आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार उपसचिव वर्षा देशमुख यांनी जारी केला आहे.