• Sun. Oct 19th, 2025

नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम; राजन विचारे यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयात फेटाळली



नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम; राजन विचारे यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयात फेटाळली

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – ठाणे लोकसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीवर ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे म्हस्के यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या एकलपीठासमोर या याचिकेची दीर्घ सुनावणी झाली होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर मंगळवारी निकाल देताना न्यायालयाने विचारे यांनी केलेले आरोप ग्राह्य धरले नाहीत व त्यांची याचिका फेटाळून लावली.

काय होती याचिका?

लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवत विजय मिळवला होता. त्यांना ७ लाख ३४ हजार २३१ मते मिळाली होती, तर ठाकरे गटाचे राजन विचारे यांना ५ लाख १७ हजार २२० मते मिळाली होती. या निकालाला आव्हान देत विचारे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये म्हस्के यांची निवड रद्द करून स्वतःला विजयी घोषित करण्याची मागणी त्यांनी केली होती.

विचारे यांचा आरोप

म्हस्के यांनी आपल्या उमेदवारी अर्जात “स्वतःला कधी दोषी ठरवलेले नाही” असे नमूद केले होते. मात्र प्रत्यक्षात, दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले होते आणि ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले होते, असा दावा विचारे यांनी केला होता. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने स्वतःवरील गुन्हेगारी खटल्याची माहिती मतदारांसमोर प्रामाणिकपणे मांडणे बंधनकारक असते. परंतु, म्हस्के यांनी ही माहिती लपवली, असेही विचारे यांनी याचिकेत नमूद केले होते.

न्यायालयाचा निर्णय

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हस्के यांच्यावरील गुन्हेगारी प्रकरणे व आरोपांच्या आधारे याचिका ग्राह्य धरण्यास नकार दिला. परिणामी, राजन विचारे यांची याचिका फेटाळण्यात आली आणि नरेश म्हस्के यांची खासदारकी अबाधित राहिली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें