• Sun. Oct 19th, 2025

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेकडून विभागप्रमुखांच्या नियुक्त्या; पश्चिम उपनगरात पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष



मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेकडून विभागप्रमुखांच्या नियुक्त्या; पश्चिम उपनगरात पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिंदेसेनेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ३२ विभागप्रमुख आणि ३ विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, असा दावा मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर दुसरीकडे मुंबईत अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी शिंदेसेनेनं फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. २०१७ मध्ये निवडून आलेले निम्म्याहून अधिक नगरसेवक शिंदेंनी गळाला लावले आहेत. ठाकरेसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदेंने फोडले आहेत. पण विभागप्रमुखांच्या नेमणुकीनंतर आता शिंदेसेनेत नाराजी उफाळून आली आहे.

विभागप्रमुखांच्या नव्या नियुक्तीनंतर शिंदेसेनेत वाद पेटला आहे. पश्चिम उपनगरातील शिंदेसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पालिका निवडणूक तोंडावर असताना त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो. शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री ३२ प्रभारी विभागप्रमुखांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली. त्यात वर्णी न लागल्यानं पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोपमध्ये नाराजी आहे. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात ठाकरेसेनेतून शिंदेसेनेत आलेले जितेंद्र जानावळे इच्छुक होते. नव्या आदेशानुसार त्यांच्याकडे विलेपार्लेच्या प्रभारी विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्याला पक्षात घेताना विलेपार्लेचे विभागप्रमुख पद देणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं. पण तसं झालं नाही, अशा शब्दांत जानावळेंनी नाराजी बोलून दाखवली. मी शिवसेनेत ३० वर्ष काम केलं आहे. तो प्रदीर्घ अनुभव पाहता पार्ल्यात शिवसेना जोमानं उभी केली असती. पुनर्नियुक्त झालेल्या विद्यमान विभागप्रमुखांच्या हाताखाली आपण काम करणार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभेत प्रभारी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती केल्यानं गणेश शिंदे नाराज झाले आहेत. ठाकरेसेनेशी संघर्ष करत गेल्या तीन वर्षांत पक्ष उभा केला. विभागप्रमुखपदी नियुक्तीचा शब्द देण्यात आलेला होता. पक्षानं न्याय न दिल्यास शेकडो कार्यकर्त्यांसोबत वेगळी वाट निवडणार असल्याचं शिंदे म्हणाले. चारकोप विधानसभेत शिंदेसेनेनं कोणाचीच नियु्क्ती केलेली नाही. त्यामुळे इच्छुक असलेले विधानसभा प्रमुख संजय सावंत नाराज आहेत. आपण आणि आपले कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सावंत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात शिंदेसेनेतील नाराजी उफाळून आली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें