‘मेगा भरती’च्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का; नाशिकमध्ये गायकवाड दाम्पत्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक : राज्यभरात भाजपकडून ‘मेगा भरती’ सुरू असताना नाशिकमध्ये मात्र शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी सोमवारी पक्षाचा राजीनामा देत ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला.
या प्रसंगी खासदार संजय राऊत, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती, ज्यातून या प्रवेशाला मिळालेल्या प्रतिसादाचे दर्शन घडले.
संगीता गायकवाड या नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्र. २० मधील माजी नगरसेविका असून भाजपमध्ये सक्रिय होत्या. त्यांच्या पक्षत्यागामुळे नाशिकमधील भाजप संघटनात खळबळ उडाली आहे. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हेमंत गायकवाड हे आता शिवसेना (ठाकरे गट) तर्फे नाशिकरोड विभागातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांच्याविरोधात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले,
> “आज नरक चतुर्दशी आहे. कृष्णाने नरकासूराचा वध केला, पण आजच्या काळात कोण नरकासूर आहे हे सांगायची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठीच संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत. आता हा प्रवाह सुरु झाला आहे. मतचोरी करून तिकडे बसलेल्यांची चोरी आपण चोरांसकट पकडली आहे.”
ते पुढे म्हणाले,
> “आज मराठी आणि अमराठी सगळे लोक या चोरांना हद्दपार करण्यासाठी एकत्र आले आहेत. जे ‘खोके’ घेऊन गेले, त्यांच्यापेक्षा निष्ठावान सैनिक मला प्रिय आहेत. मी भाजपच्या नेत्यांना सांगू इच्छितो, विष पाजणाऱ्यांचे पाप इतिहास विसरत नाही. नाशिकमध्ये पुन्हा आलो, तेव्हा भगवा झेंडा फडकलेला दिसला पाहिजे.”
भाजपच्या ‘मेगा भरती’ मोहिमेच्या दरम्यान ठाकरे गटाने केलेली ही ‘मेगा गळती’ नाशिकच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारी ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.