मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार; सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका अखेर बिनविरोध पार पडल्या आहेत. विविध प्रभागांमध्ये विरोधात कोणतीही उमेदवारी दाखल न झाल्याने औपचारिक निवड जाहीर होणे बाकी होते. सर्वाचं लक्ष लागलेल्या जी उत्तर प्रभाग समितीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जी-उत्तर प्रभाग समितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रभागात ठाकरे गटाचे जोसेफ कोळी आणि मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या १५ मिनिटे आधी जोसेफ कोळी यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेचे यशवंत किल्लेदार यांची जी-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
मुंबई महापालिकेतील एकूण सहा प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्व प्रभागांमध्ये विरोधात कोणतीही उमेदवारी दाखल न झाल्याने त्या ठिकाणी उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
निवड झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षांची यादी –
एच-पूर्व/पश्चिम : रोहिणी कांबळे (शिवसेना ठाकरे), के-पश्चिम : रोहन राठोड (भाजप),के-दक्षिण/के-उत्तर : प्रकाश मुसळे (भाजप),पी-दक्षिण : श्रीकला पिल्ले (भाजप),जी-दक्षिण : पद्मजा चेंबूरकर (शिवसेना ठाकरे)
जी-उत्तर : यशवंत किल्लेदार (मनसे).

