विधान परिषद निवडणुकीत मविआची आक्रमक रणनीती; सर्व १७ जागा लढवणार, जागावाटप अंतिम टप्प्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंतिम निर्णयासाठी २८ मे रोजी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून त्यानंतर अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
१८ जून रोजी विधान परिषदेच्या १७ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक सात ते आठ जागांवर उमेदवार देण्याची शक्यता असून ठाकरे गटाची शिवसेना पाच ते सहा जागांवर लढू शकते. तर शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तीन ते चार जागांवर दावा ठोकणार असल्याचे सांगितले जाते.
मविआमध्ये ‘ज्या भागात त्या पक्षाची ताकद, ती जागा त्या पक्षाला’ या सूत्रावर जागावाटपाची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यानुसार चंद्रपूर आणि सांगली-सातारा परिसरातील जागांवर काँग्रेसचा दावा मजबूत मानला जात आहे. तर परभणी-हिंगोली भागात ठाकरे गटाची शिवसेना आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, महायुतीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या अंतर्गत रस्सीखेचीचा फायदा घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे. त्यामुळेच सर्व १७ जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दुसरीकडे, महायुतीत मात्र जागावाटपावरून तिढा कायम असल्याचे चित्र आहे. भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपासाठी जोरदार चर्चा सुरू असून अंतिम निर्णयासाठी दिल्ली दरबार गाठण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीमध्ये वरिष्ठ भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
याशिवाय छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील आणि जयकुमार रावल हे काही मंत्रीही दिल्लीला जाणार असल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेऊन जागावाटपाचा अंतिम तोडगा काढण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

