जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणले; काश्मीर पर्यटकांच्या मदतीवरुन नरेश मस्केंचे वादग्रस्त विधान
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी सरकारने मोहीम सुरू केली आहे. अशात आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी भाष्य केलं. जे लोक कधीही विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणलं असं नरेश मस्के म्हणाले. त्यावरून आता त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये राज्यातील सहा पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्याचवेळी राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे. त्याचवेळी शिवसेनेची एक टीमही त्या ठिकाणी पोहोचली आहे. स्वतः एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेले आहेत आणि अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा वेळी त्यांच्याच खासदाराने हे असंवेदनशील वक्तव्य केलं आहे.
खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमच पथक काश्मीरला पाठवलं. एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी पोहचलेले आहेत. कोल्हापूर, केरळ आणि इर्शाळवाडी या ठिकाणी एकनाथ शिंदे सर्वात आधी पोहचून मदत करत होते. सरकार तर मदत करत आहे. जे लोक कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी विमानांत बसवून आणलं. नरेश म्हस्के म्हणाले की, ४५ लोक रेल्वेने पहलगामला गेले होते. गरीब लोक, त्यांच्या खाण्याचे वांदे होते. सीआरपीएफच्या कँपमध्ये ते लोक राहत होते. त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी विमानतळावर आणलं. ती लोक पहिल्यांदाच विमानात बसली आहेत. रेल्वेने गेलेली लोक ते घाबरलेली आहेत, पहिल्यांदा विमानात बसलेत.