ठाण्यात मेट्रो ४ व ४अ टप्पा-१ वर तांत्रिक तपासणी व ट्रायल रन; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यातील नागरिकांसाठी महत्वाचा टप्पा गाठत मेट्रो मार्ग ४ आणि ४अ च्या टप्पा-१ प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रन सोमवारी पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते.
या विभागात गायमुख जंक्शन – घोडबंदर रोड – कासारवडवली – विजय गार्डन असा मार्ग समाविष्ट असून आवश्यक पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, मार्गिका व ओव्हरहेड इक्विपमेंट पूर्ण झाल्याचे एमएमआरडीएने सांगितले. फडणवीस व शिंदे यांनी या मेट्रोने प्रवास करून तपासणी केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
> “३५ किमी लांबीच्या या मेट्रो मार्गासाठी सुमारे १६ हजार कोटींचा खर्च होत आहे. हा देशातील सर्वात मोठा ५८ किमीचा मेट्रो मार्ग ठरणार असून दररोज सुमारे २१ लाख प्रवासी या सेवेतून प्रवास करू शकतील. प्रवासाचा वेळ ५०% ने कमी होईल आणि रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत होईल.”
तसेच, त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष अभिनंदन करत सांगितले की, मोगरपाडा येथे डेपोकरिता जागा मिळवून प्रकल्पातील मोठा अडथळा दूर करण्याचे श्रेय त्यांना जाते.
यादरम्यान स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांचेही फडणवीसांनी कौतुक केले. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व टप्पे प्रवाशांसाठी खुले करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.