तीन पक्षांच्या अपूर्व युतीला शिंदे गटाचा धक्का; ठाण्यातील स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – शतक महोत्सवी परंपरा असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मोठा विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या पॅनलने भाजप, ठाकरे गट आणि मनसे या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या अपूर्व युतीला पराभूत करत नऊपैकी पाच जागांवर कब्जा केला. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट-मनसे अशा तिरंगी रंगात रंगली होती. त्यामुळे निवडणुकीकडे शहरातील राजकीय वर्तुळासह क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले होते.
शिवसेना पॅनलचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, परिवहन सभापती विलास जोशी, ॲड. कैलास देवल, श्रावण तावडे आणि किरण साळगावकर यांनी विजय मिळवला. तर मावळत्या कार्यकारिणीतील माजी अध्यक्ष डॉ. राजेश मढवी, सचिव दिलीप धुमाळ, अतुल फणसे आणि डॉ. योगेश महाजन यांनी आपली जागा कायम राखली. गेल्याच महिन्यात झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत शिवसेना-भाजपने वर्चस्व गाजवले होते. ठाकरे गट व मनसेच्या युतीला तेथे भोपळाही फोडता आला नव्हता. त्याच धर्तीवर स्पोर्टिंग क्लबच्या निकालामुळे या युतीला आणखी धक्का बसला आहे. स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट क्षेत्रातील अग्रगण्य संस्था मानली जाते. संस्थेच्या माध्यमातून ठाण्यातील क्रिकेट व सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी काम होणार असल्याचे विजयी पॅनलचे नेते विकास रेपाळे यांनी सांगितले. “विरोधकांनाही सोबत घेऊन पुढे जाणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीत सुरुवातीला २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी माघार घेतली. यात मावळत्या कार्यकारिणीतील प्रशांत गावंड यांची माघार विशेष चर्चेचा विषय ठरली. सदर निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, संजीव नाईक यांसारख्या नेत्यांनी मतदान करून उपस्थिती लावली होती.