कल्याण परिसरात अनधिकृत चालणारा सावरिया आइस्क्रीम धंदा जोमात, केडीएमसी अधिकारी कोमात
केडीएमसी अधिकाऱ्यांच्या संगनमताने कल्याण परिसरात सावरिया आईस्क्रीम मालकाची अनेक ठिकाणी मक्तेदारी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सावरिया आईस्क्रीम हे दुकान कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने बिनदिकतपणे चालू आहे. गेली अनेक वर्ष सावरिया आईस्क्रीम पार्लर हे दुकान विनापरवाना महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगतमताने चालू आहे. एवढेच नाही तर सावरियाचा मालक शंकरलाल किसनलाल तेली याच्या अनेक आईस्क्रीम पार्लरच्या गाड्या कल्याण शहरात रस्त्याच्या कडेला ठीक ठिकाणी सुरू आहेत. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी व दैनिक पोलीस महानगर ने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त तसेच उपायुक्त यांच्याकडे वारंवार तक्रारी करून देखील सावरिया आईस्क्रीमच्या पार्लर वरती कोणतीही कारवाई आजतागायत करण्यात आलेली नाही. यासंदर्भात दैनिक पोलीस महानगर ची टीम व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रेम साळवे आणि दिनेश गांगवे यांनी उपायुक्त अवधूत तावडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व त्यांना वारंवार फोन करून सदर सावरीया आईस्क्रीम पार्लर वर कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात आली असता अवधूत तावडे यांनी थातूरमातूर उत्तर देत अजून पर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी इतर वेळी सर्वसामान्यांच्या गाड्या रस्त्यावर धंदा करताना दिसतात त्यावेळी महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगात काही संचारल्याप्रमाणे त्या गाड्यांची तोडफोड करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सावरिया आइस्क्रीम पार्लरचा मालक शंकरलाल किसनलाल तेली याच्या अनधिकृत, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आईस्क्रीम पार्लर सारख्या दुकानावर कोणतीही कारवाई केली जात नाही, याचे गौड बंगाल काय आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.
दैनिक ‘पोलीस महानगर’ नेहमीच अनधिकृत व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेत आलेला आहे. अशीच कारवाई सावरिया आईस्क्रीम पार्लरवर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त अवधूत तावडे, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग, ठाणे व विभाग अधिकारी, बाजार परवाना, केडीएमसी त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र सावरिया पार्लर दुकानच्या मालकावर कारवाई होताना दिसत नाही. सावरीयाच्या मालकाने सदर आस्थापना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रिगल हॉटेलमध्ये भाडेतत्त्वावर घेतली आहे. पण, या ठिकाणी देखील कुठलेही परवाने न घेता अनेक महिन्यांपासून सावरिया आईस्क्रीम चा मालक रिगल हॉटेलचा परवाना दाखवून व्यवसाय करीत आहे. म्हणजेच रिगल हॉटेलच्या परवानावर सावरिया आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू आहे आणि अनेकांनी तक्रार केल्यानंतर सावरीयाचा मालक दिखाव्यासाठी कागदपत्रे घेऊन महानगरपालिकेत धावपळ करून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. महानगपालिकेने नोटीस काढून तीन दिवसांची मुदत दिली होती पण पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही तो कागदपत्रे सादर करू शकला नाही, केडीएमसीच्या अनधिकृत विभागाने योग्य ती कडक कारवाई न करता सरळ सरळ त्याला वाचविण्याचे काम केले आहे, जर महानगपालिकेचे अधिकारी असे बेकायदेशीर कृत्य करत असतील तर मग कल्याणमध्ये बाकीचे व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कारवाईचा सूड का उगारतात ? असं असेल तर मग सर्वांना नियम सारखेच असायला हवेत आणि परवाना विभाग हा कायमचा बंद करून जे नियम व अटी आहेत त्या पण रद्द करून टाकण्याची आवश्यकता आहे अशी संतप्त प्रतिक्रिया इतर दुकानदार व्यक्त करीत आहेत. जर महानगरपालिकेला फक्त पैसेच हवे असतील तर मग कायदे, अटी व नियम यांची गरज काय ? काही अधिकारी चिरीमिरी घेऊन सदर दुकानावर कारवाई करत नाहीत अशी चर्चाही ऐकायला मिळते. सावरिया आईस्क्रीमचा मालक शंकरलाल किसनलाल तेली हा कल्याणमधील वेगवेगळ्या ठिकाणी सावरिया आईस्क्रीम च्या ६ ते ७ गाड्या लावून केडीएमसी ला चुना लावण्याचे काम इमानेइतबारे करीत आहे. अशी फसवणूक करणाऱ्या शंकरलाल किसनलाल तेली यांच्यावर गुन्हा दाखल करून सदर दुकान कायमचे सील करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.