कल्याण – भिवंडी मार्गावरील गोवा नाका येथील प्रतीक वाईन अँड डाईन मालकाकडून शासनाची फसवणक
राज्य उत्पादन शुल्क चे स्थानिक निरीक्षक कुणाची चाकरी करतात ?
प्रतिक बार अँड रेस्टॉरंटची अनुज्ञाप्ती रद्द करण्याची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण भिवंडी मार्गावरील गोवा नाका परिसरात असलेले प्रतीक बार व रेस्टॉरंट हे राज्य उत्पादन शुल्कच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डोळ्यादेखत करचुकवेगिरी करत आहेत. लाखो रुपये खर्च करून, प्रसंगी कर्ज काढून, प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण करून, रीतसर एखादा व्यक्ती देशी-विदेशी मद्य विक्री व्यवसाय चालू करतो, त्यातून शासनाला महसूल मिळतो, पण प्रतीक बार अँड रेस्टॉरंट (वाईन अँड डाईन) चालवणाऱ्या मालकाकडून वाईन शॉप सारखे काऊंटर चालू करून बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्य विक्री करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला जातोय. मात्र राज्य उत्पादन शुल्कचे स्थानिक अधिकारी शासनाच्या बुडणाऱ्या महसूलापेक्षा त्यांच्याकडे जाणूनबुजून कारवाई करीत नाहीत असे तेथील स्थानिक नागरिक बोलतात.
मुळात महाराष्ट्र राज्यात परमिट रूम, रेस्टॉरंट, बार, क्लब व इतर ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत, हे वास्तव आहे. कधीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार प्रतीक वाईन अँड डाईनवर सुरू आहे. बार अँड रेस्टॉरंटचा परवाना असताना इतर ठिकाणावरून देशी-विदेशी मद्य आणून ते वाईन शॉप सारखा हुबेहूब काऊंटर उभा करून बेकायदेशीरपणे एमआरपी किंमतीत मद्य करून शासनाचा महसूल बुडवला जात आहे. विशेषतः शहरातील व परिसरातील वाईनशॉप पेक्षा बार अँड रेस्टॉरंटवर अनधिकृतरित्या होणारी दारू विक्री अधिक असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. बार अँड रेस्टॉरंट धारकांकडून शासनाला कसलाच नफा होत नाही, शासनाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या बिनदिक्कत, राजरोसपणे मद्य विक्री केली जाते. सदर बार रूमचे मालक इतर वाईनशॉपच्या मालकांकडून देशी-विदेशी मद्य कमी दरात खरेदी करून परमिटरूमच्या काऊंटरवरून शासनाचा कर बुडवून फसवणूक विक्री केली जात आहे.
काय आहे कायदा?
परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. ग्राहकाकडे परवाना आहे की नाही, हे पाहण्याची आणि त्यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकलेली आहे. या नियमांचे कोणीही मद्यविक्रेता पालन करत नाही. एकाही मद्य विक्री दुकानात मद्य सेवन परवाना विचारला जात नाही
१० परमिटरूम धारकांवर कठोर कारवाई
मागील महिन्यात ठाणे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आलेल्या १० परमिटरूम कठोर कारवाई करून त्यांची अवैद्यरित्या चालू असलेली दुकानदारी संपुष्टात आणली. त्याचप्रमाणे कल्याण भिवंडी मार्गावरील गोवा नाका येथील प्रतीक वाईन अँड डाईन या रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे, ठाणे कोकण विभाग उपायुक्त व भिवंडी निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे.