मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याची बतावणी; भाजपचा ‘व्हीआयपीची कार्यकर्ता अडचणीत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – कांदिवली येथील भाजपचा कार्यकर्ता देवांग दवेच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. कांदिवलीती एका सामाजिक कार्यकर्त्याने ही तक्रार दाखल केली असून यात त्याने म्हटले आहे की विधीमंडळाच्या दोन्ही सदनाचा सदस्य नसतानाही दवे त्याच्या गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरतो. संतोष घोलप नावाच्या कार्यकर्त्याने या संदर्भातील तक्रार मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडे केली आहे. घोलप यांनी म्हटले आहे की त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचा अहवाल आयुक्त कार्यालयाला सादर करण्याचे आदेश दिल्याचे घोलप यांचे म्हणणे आहे.दवे हे यापूर्वी अनेकदा वादात सापडले असून त्यांच्याविरोधात यापूर्वी ठाकूर संकुलातील फेरीवाल्यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. दवे हे प्रत्येक फेरीवाल्याकडून महिन्याला ५ हजार रुपयांची खंडणी मागत असल्याचा या फेरीवाल्यांनी आरोप केला होता.
दवे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या घोलप यांनी म्हटले आहे की, दवे हे आपले राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे भासवत बेकायदेशीर कृत्ये करतात. दवे हे भाजपचे कार्यकर्ते असून त्यांच्या अशा वर्तनामुळे राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपची प्रतिमा मलीन होत असल्याचेही घोलप यांनी म्हटले आहे. घोलप यांनी म्हटले आहे की दवे हे एमएच ४६-एटी -९७०० या गाडीतून फिरतात आणि या गाडीवर आमदारांसाठी असलेला स्टीकर लावण्यात आलेला आहे. विधान सभा किंवा विधान परिषदेचे सदस्य नसतानाही दवे त्यांच्या गाडीवर आमदाराचा स्टीकर कसा काय लावू शकतात असा सवाल घोलप यांनी विचारला आहे.काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावर चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये देवांग दवे आणि आमदार प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.