• Sat. Oct 18th, 2025

पूरस्थितीचा विचार करून एसटी भाडेवाढ रद्द; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा



पूरस्थितीचा विचार करून एसटी भाडेवाढ रद्द; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) जाहीर केलेली १० टक्के बसभाडे दरवाढ रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली.

एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करून साधारण ३० कोटी रुपयांचा महसूल मिळविते. यंदाही १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही वाढ लागू होणार होती. परंतु राज्यातील पूरग्रस्तांच्या अडचणींचा विचार करून ही वाढ मागे घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिंदे म्हणाले, “पूरस्थितीमुळे सर्वसामान्यांवर आधीच आर्थिक ओझे आले आहे. त्यामुळे यंदा अपवादात्मक निर्णय घेत, एसटीची १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत. यामुळे लोकांची दिवाळी गोड होईल.”

एसटीचे भाडे वाढीचा निर्णय सोमवारीच जाहीर झाला होता. या निर्णयामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला काप बसणार होता. आधीच अनेक प्रवाशांनी ॲडव्हान्स आरक्षण केले होते, ज्यांना नवीन व जुन्या दरातील फरक भरावा लागणार होता. परंतु फक्त चोवीस तासांतच हा निर्णय मागे घेतल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, दिवाळीच्या काळात एसटीच्या तिकिटांना प्रचंड मागणी असते. गर्दीमुळे अनेक वेळा आरक्षण मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत भाडेवाढ रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें