सायबर फसवणुकीत ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : “रस्ता अपघातानंतर जसा ‘गोल्डन अवर’ जीव वाचवतो, तसाच सायबर फसवणुकीतही तात्काळ तक्रार महत्त्वाची ठरते. त्वरित कारवाई झाल्यास फसवणूक झालेली रक्कम परत मिळवणे शक्य होते. म्हणूनच नागरिकांनी १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईनवर लगेच तक्रार द्यावी,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२५’ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झाले. यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे फिशिंग, डीपफेक, ओटीपी फसवणूक, आवाज-चेहरा क्लोनिंग यांसारख्या नव्या पद्धतींनी लोकांना फसवले जात आहे. डिजिटल व्यवहारातील माहितीचा गैरवापर होऊन खंडणी, बुलिंगसारखे गुन्हे घडतात. “तंत्रज्ञानच धोका आहे, पण उपायही तंत्रज्ञानाचाच आहे. मात्र वेळेवर तक्रार नोंदविणे अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.
राज्यात अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी लॅब आणि प्रतिसाद केंद्रे उभारली असून, कोणताही डिजिटल गुन्हा मागे ‘फिंगरप्रिंट’ ठेवतो, असेही त्यांनी सांगितले. युवकांमध्ये सायबर सुरक्षिततेची जनजागृती व्हावी यासाठी कम्युनिकेटर्सची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेचा उल्लेख करून, महाराष्ट्र पोलीसही शहरापासून सोशल मीडियापर्यंत व्यापक जनजागृती राबवत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी ‘सायबर योद्धा’ या बाल कॉमिक बुकलेटचे प्रकाशन करण्यात आले तसेच सायबर सुरक्षेत योगदान देणाऱ्यांचा सत्कारही झाला. विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी आभार मानले.