राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची शरद भेट!
सरनाईक यांनी अचानकपणे शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. सरनाईक यांनी अचानकपणे शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, ही भेट दिवाळी निमित्ताने शुभेच्छा देणारी भेट असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीमध्ये स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे. तर, काही ठिकाणी नवीन समीकरणे जुळली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय पक्षाच्या, नेत्यांच्या बैठकांना जोर आला आहे. अशातच आज शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र विहंग सरनाईक हेदेखील उपस्थित होते. आजची भेट फक्त दिवाळी निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी घेतलेली भेट होती, असे सांगण्यात आले.
प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. पवारांसोबत झालेली ही भेट आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने होती. मात्र, ही निवडणूक मु्ंबई क्रिकेट असोसिएशनची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अनेक महत्त्वाचे चेहरे रिंगणात असणार आहेत. अध्यक्षपदासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. विहंग सरनाईक यांचेही नाव सध्या चर्चेत आहे. विहंग सरनाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असून मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. पवारांसोबत झालेल्या भेटीत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जागतिक क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनवर यापूर्वीही राजकारण्यांचं वर्चस्व राहिलं आहे. शरद पवार यांच्यासह दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवलं आहे. शरद पवार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणावर पकड असून भाजप नेते आशिष शेलारही यांचेही वजन आहे.