अशोक खरात प्रकरणात राजकीय भूकंप; या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय कडूनही कारवाई होणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडूनही कारवाई होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणालाही वाचवले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.मुख्यमंत्री म्हणाले की, अशोक खरात यांच्या विविध आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यांच्या संपूर्ण मालमत्तेचा मागोवा घेतला जात असून, सर्व गैरव्यवहार उघडकीस आणले जात आहेत. तसेच महिलांबाबत केलेल्या गैरवर्तनाच्या तक्रारींचीही गंभीरपणे तपासणी केली जात आहे.
या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कडक शिक्षा देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात एकमत असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारची कारवाई ही राजकारणापलीकडची असून, काहीजण या मुद्द्यावर राजकारण करत असले तरी त्याला महत्त्व दिले जाणार नाही. सरकार आपले कर्तव्य पार पाडत कठोर पावले उचलेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकरणात आतापर्यंत १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. तपासाची सर्व माहिती रोज देणे शक्य नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी योग्य वेळी तपशील जाहीर करेल, असे स्पष्ट केले. एसआयटीच्या कामावर विश्वास ठेवावा, कारण ती प्रभावीपणे तपास करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून निश्चितच चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ईडीने या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेतली असून कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित जमिनींची ओळख पटताच कायद्यानुसार पुढील पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, कुणालाही सोडणार नाही, असा ठाम इशारा देत त्यांनी म्हटले की, कोणालाही बेकायदेशीररित्या सीडीआर मिळवण्याचा अधिकार नाही. तो फक्त तपास यंत्रणांकडेच असतो. सीडीआर कसा लीक झाला आणि त्यामागे कोण आहे, याचा शोध राज्य सरकार घेणार आहे. संवेदनशील प्रकरणांमध्ये केवळ आरोप-प्रत्यारोप न करता ठोस पुराव्यावरच कारवाई होईल. अशोक खरातच्या गैरकृत्यांमध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

