राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज निर्णय!
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती; तर सोलापूर-धाराशिवसाठी अभियांत्रिकीची भेट
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये आदिवासी आश्रमशाळांची श्रेणीवाढ आणि नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा समावेश आहे.
दुर्गम आणि डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण सुलभ व्हावे, यासाठी सरकारने आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय घेतला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ५ प्राथमिक शाळांची माध्यमिक स्तरावर, तर १९ माध्यमिक शाळांची कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर श्रेणीवाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गळती थांबण्यास मदत होणार आहे. यासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये याच शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) पदवीस्तराचे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. यामध्ये प्रत्येकी ६० प्रवेश क्षमतेचे:एआय आणि मशिन लर्निंग,कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग,इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (ETC) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सोलापूर आणि परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील ‘श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय’ आता अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर संस्थानमार्फत चालवल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाचे आता शासकीय सक्षमीकरण होईल. यामुळे महाविद्यालयाला अधिक निधी, अद्ययावत शैक्षणिक सुविधा आणि दर्जेदार प्राध्यापक उपलब्ध होतील, ज्याचा थेट फायदा स्थानिक ग्रामीण विद्यार्थ्यांना होईल.

