• Fri. Jun 5th, 2026

आमचा त्याग कामाख्या देवीला माहिती आहे,पण भाजप तो त्याग विसरली – अब्दुल सत्तार



आमचा त्याग कामाख्या देवीला माहिती आहे,पण भाजप तो त्याग विसरली – अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तारांचा भाजपवर खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटली असून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निर्णयाला धुडकावून लावत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यानंतर आता स्वतः अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत महायुतीमधील अंतर्गत युद्ध चव्हाट्यावर आणले आहे.

अब्दुल सत्तार यांचा भाजपवरील राग अनावर झाला. अत्यंत आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले, “शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे. भाजप आमच्या पक्षात गटतट पाडत आहे. त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकंच तोडून टाकलं आहे.पुढे बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली की, “आमची जिल्हा परिषद गेली, महापालिकेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांच्या काळापासून असणारी सत्ताही संपली, आता आमच्याकडे राहिलं काय? अनेक छोट्या जागांवर वैयक्तिक भाजपचे नेते मोठे होत आहेत आणि शिवसेनेला संपवले जात आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, असे विधान केले आहे. याबाबत विचारले असता अबुल सत्तार म्हणाले की “मलाही वाटतं की आता दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत. आमच्या नेत्यांनी, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर कोणालाही विचारण्याची गरज उरणार नाही. माझा नेता जो निर्णय घेईल, तो मला पूर्णपणे मान्य असेल,” असे त्यांनी यावेळी म्हटले. जिल्ह्यात शिवसेनेत दोन भाग करून एका भागाला हाताशी धरायचे आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा, अशी खेळी खेळून जर आमचा ‘मोठा भाऊ’ आम्हालाच संपवणार असेल, तर आमच्याकडे दुसरा इलाज नाही, असा संताप देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची तुलना थेट पश्चिम बंगालशी करताना सत्तार म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते. नंतर त्यांच्यातील समन्वय तुटला आणि आज ते एकमेकांना मारत आहेत. महाराष्ट्रात आमची तशी ‘ममता’ होऊ नये, याची काळजी आणि दक्षता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आमचा नेता शेतकरी, दलित, मजूर आणि सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा आहे, त्यामुळे आमची ममता होणे शक्य नाही,” असे देखील ते म्हणाले. अब्दुल सत्तार यांच्या विधानावर आता भाजप काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें