• Sat. Aug 8th, 2026

एमएच-सीईटी परीक्षेवर आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप; ‘कमी गुण असूनही ९९ पर्सेंटाइल कसे?’ म्हणत चौकशीची मागणी



एमएच-सीईटी परीक्षेवर आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप; ‘कमी गुण असूनही ९९ पर्सेंटाइल कसे?’ म्हणत चौकशीची मागणी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : नीट आणि एमपीएससी परीक्षांनंतर आता एमएच-सीईटी परीक्षेच्या निकालावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. बारावीमध्ये कमी गुण असतानाही काही विद्यार्थ्यांना एमएच-सीईटी परीक्षेत तब्बल ९९ पर्सेंटाइल मिळाल्याचा दावा करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी कथित सीईटी घोटाळ्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात भाजपशी संबंधित काही व्यक्तींच्या मुलांना फायदा झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. एमएच-सीईटी परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत बोलताना त्यांनी नांदेड आणि भंडारा येथील काही विद्यार्थ्यांच्या गुणांवर प्रश्न उपस्थित केले. बारावीचे गुण आणि सीईटी मधील पर्सेंटाइल यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

“भाजपशी संबंधित लोकांच्या मुलांना टॉपर करण्यासाठी हा प्रकार केला जात आहे का? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सरकारने या प्रकरणाची भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवरील कारवाईवरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. सिजेपी आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.

नीट पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाई, लाठीचार्ज आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. “विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेतले असते तर परिस्थिती एवढी चिघळली नसती,” असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

एमएच-सीईटी परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नसल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आव्हान दिले. प्रवेश प्रक्रियेवर याचा परिणाम होणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर सरकार आणि भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच सीईटी प्रक्रियेबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें