उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच ‘टिप टिप बरसा पानी’
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालाच गळती
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – पावसाची रिपरिप सुरु असताना ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालाच गळती लागली असल्याचे समोर आले. या कक्षाला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना त्यांच्या समोरच छतातून पाणी ठिबकत होते. दरवर्षी पावसाळ्याआधी या कक्षाच्या छतावर प्लास्टिक टाकण्यात येते. मात्र यंदा पावसाने लवकरच हजेरी लावल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत, असे शिंदे यांनी ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देतेवेळी स्पष्ट केले. शुन्य जिवितहानी हे आपले लक्ष्य आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती उद्भवली, तक्रार आली तर कमीत कमीत वेळेत प्रतिसाद देऊन, यंत्रणांनी मदतीसाठी तत्पर असावे, असे निर्देशही शिंदे यांनी दिले. याप्रसंगी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, अनघा कदम उपस्थित होते.
ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ३८ ठिकाणी उच्च क्षमतेचे ६६ पंप बसवण्यास आलेले आहेत. आतापर्यंत एकूण १३५ मिमी पाऊस झाला. पण पाणी साठण्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. जिथे थोडेफार होते तेही पंपांच्या मदतीने काढण्यात आले, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ६ नाल्यांवर फ्लड सेंसर कार्यरत असून नाल्याची पातळी वाढताच अलर्ट मिळणार आहे. त्यामुळे भविष्यातील हानी रोखता येणे शक्य आहे. २९ जवानांचे टीडीआरएफ पथकही तैनात असून सी वन गटातील अतिधोकादायक ९० इमारतींपैकी ४२ इमारती रिकाम्या आहेत. सहा इमारतीतून रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आले आहे. तसेच, १९७ कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. पावसामुळे सुरु असलेल्या आरोप – प्रत्यारोपाबाबत मला बोलायचे नाही. आम्हाला सर्वप्रथम नागरिकांना मदत करायची आहे. ही आपत्ती आहे, या संकटकाळात पाऊस १५ दिवस आधी आला असून काही प्रमाणात तारांबळ उडालेली आहे. नागरिकांचीही गैरसोय झाली आहे. राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते. गेले २५ वर्षे मुंबईत कोणाची सत्ता होती, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे मला या विषयावर भाष्य करायचे नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिंदे यांनी केले.