नवी मुंबई महायुतीत बिघाडी?
मनपा निवडणुकीत शिवसेनेचा इशारा; आलात तर सोबत अन्यथा तुमच्याशिवाय
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – नवी मुंबईत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आगामी मनपा निवडणुकीत आलात तर सोबत अन्यथा तुमच्याशिवाय असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात जात भाजपलाच आव्हान दिलंय. आगामी निवडणुकीत सोबत आल्यास ठिक अन्यथा तुमच्याशिवाय निवडणूक लढणार असल्याचं म्हणत स्वबळाचा नारा दिलाय. दरम्यान पालिका निवडणूक एकत्र लढायची की स्वतंत्र? याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचं भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी म्हटलंय. नरेश म्हस्केंनी नवी मुंबईत जात स्बळावर लढण्याचा नारा पहिल्यांदाच दिला नाहीय. २२ एप्रिलला ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता दरम्यान यावेळी त्यांनी आगामी पालिका स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचं वक्तव्य केलं होतं.
गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेतल्यानंतर शिंदेंची शिवसेनेनं आपला मोर्चा नवी मुंबईकडे वळवल्याचं दिसतंय. कारण गणेश नाईकांनी ठाण्यात जात एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं होतं. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. भाजपकडून ठाण्यात मोठ्या प्रमाणावर जोर दिला जातोय. तर तिकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील नवी मुंबईमध्ये रणनीती आखण्यात येतेय. त्यामुळे महायुती आगामी पालिका एकत्र लढणार की स्वतंत्र हे देखील पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.