• Sun. Oct 19th, 2025

ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती



ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावतीने ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या नियुक्तीने ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याआधी देखील उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी विविध समित्यांवर दिल्लीत नरेश म्हस्के यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेश म्हस्के यांच्या रूपाने शिंदे यांच्या शिवसेनेचे दिल्ली दरबारी वजन वाढले आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या तीन सदस्यांच्या नावांची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह कालिचरण मुंडा, संबित पात्रा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था देशातील पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचे संरक्षण करणारी, प्रसारमाध्यमांवर देखरेख ठेवणारी आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करणारी एक महत्वाची संवैधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे. नरेश म्हस्के यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची आणि वक्तृत्वाची या परिषदेवर नियुक्ती झाल्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला निश्चितच नवे बळ मिळेल, असा विश्वास शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

खासदार नरेश म्हस्के यांना नुकताच ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. खासदार नरेश म्हस्के हे महत्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य तसेच वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समिती सदस्य, रेल्वे सल्लगार समिती सदस्य, हिंदी भाषा सल्लागार समिती, पोस्ट आणि दूरसंचार मंत्रालय सल्लागार समिती सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या काही महिन्यातच संसदेतील महत्वपूर्ण पदे भूषवित असल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्य यामुळेच मला संसदेत काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. या दोन्ही नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला आघाडी व शिवसैनिकांचे हे यश असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें