ठाण्यात ठाकरे गटाच्या बॅनरवर झळकले ठाकरे बंधूचे एकत्रित फोटो; मनोमिलनासाठीचं कारणही सांगितलं; ठाकरे बंधूंच्या नव्या पोस्टरची जोरदार चर्चा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. यातच निवडणूकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली असताना ठाकरेंचे दोन्ही पक्ष म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे यांची सेना शनिवारी एकत्र दिसले. यानंतर आता दिवा शहरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि याच बॅनरची आता चर्चा सुरु झाली. बॅनरवर चक्क दोन्ही ठाकरे बंधूचा फोटो आहे, याशिवाय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाटे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा एकत्र फोटो लावण्यात असून कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे एकत्र हवे. भ्रष्टाचार करणाऱ्याचं पितळ उघडं करण्यासाठी हे एकत्र हवे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी हे एकत्र हवे. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहराच्या विकासासाठी हे एकत्र हवे, असा संदेश देण्यात आला आहे. तर अमित ठाकरे आणि मनसे नेते राजू पाटील यांचाही फोटो लावण्यात आला.
याबाबत ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी सांगितले की कालच्या पलावा पुलाच्या आंदोलनात कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित झाले. तसेच दोन्ही पक्षातील कार्यकर्ते सुद्धा उपस्थित झाले.त्यामुळे चैतन्य निर्माण झाले. दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत सर्व कार्यकर्ते कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही दिव्यात बॅनरबाजी केली आहे. कशासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले पाहिजेत त्या अनुषंगाने बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि तसा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही बंधू आणि दोन्ही पक्ष एकत्र येणार कां हे पहावे लागेल.