घराबाहेर शौचालय बांधण्याच्या वादातून तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला; खडकपाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरु
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – घराबाहेर शौचालय बांधण्याच्या वादातून एका तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना कल्याण उंबर्डे परिसरात घडली. विक्रांत जाधव असे या जखमी तरुणाचे नाव आहे. जाधव यांच्या शेजारी राहणाऱ्या गायकवाड कुटुंबातील तरुणांनी हा हल्ला केल्याचा आरोप विक्रांत जाधव आणि त्यांचे वडील विजय जाधव यांनी केला. विक्रांतवर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात विजय जाधव हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या शेजारीच गायकवाड कुटुंब राहते. विजय जाधव राहत असलेल्या घराच्या जागेवर गायकवाड कुटुंबीयांनी दावा केला असून या जागेवरून जाधव व गायकवाड कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. विजय जाधव यांनी आपल्या घराशेजारी शौचालय बांधण्याचे काम सुरू केले होते. या कामाला गायकवाड कुटुंबाने विरोध केला. आठवडाभरापूर्वी हे काम सुरू असताना गायकवाड कुटुंब या ठिकाणी आले व त्यांनी हे काम बंद पडल्याचा आरोप विजय जाधव यांनी केलाय. तसेच गायकवाड कुटुंबियांनी त्यांना काम सुरू केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप देखील विजय जाधव यांनी केला. रविवारी सकाळी विजय जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव हा घराशेजारील परिसरात पाणी आणण्यासाठी गेला. याच वेळेस विक्रांतला एकट्याला गाठून गायकवाड कुटुंबातील तरुणांनी विक्रांतवर तलवारीने हल्ला केला.या हल्ल्यात विक्रांत जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. विजय जाधव यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी घराशेजारी शौचालय बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, शेजारी राहत असलेल्या गायकवाड कुटुंबीयांनी या कामाला विरोध केला. वाद इतका वाढला की, दोन लाखांची मागणी करत तसेच जीव मारण्याची धमकीही देण्यात आली.